मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे दोन वेळचे जेवण मिळवणेही कठीण झालेल्या मुंबईतील तब्बल सात लाख गरजू-कामगारांना महानगरपालिकेकडून जेवण आणि धान्य पुरवठा केला जात आहे. जेवणासाठी प्रतिमहा पालिकेकडून 73.50 कोटी रुपये खर्च करून दोन वेळचे जेवण, सकाळचा नाष्टा दिला जात आहे. आता धान्याची गरज असलेल्यांना तांदूळ, गहू, डाळ असे 10 किलो धान्य दरमहा देण्यात येणार आहे. यावर पालिका 16 कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने सलग चौथा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाकी सर्व कारभार बंद आहे. त्यामुळे मुंबईत परप्रांतीय मजूर, कामगार मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. गरीब, गरजूंच्या दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने या अशा लाखो लोकांसाठी दररोज दोन वेळ अन्नाची पाकिटे देणे सुरू केले आहे. एक पाकिटासाठी पालिकेला 35 रुपये याप्रमाणे दरमहा 73.50 कोटींचा खर्च येत आहे. मात्र आता मागणीनुसार धान्याचे वाटपही करण्यात येणार आहे. यामध्ये 22 रुपये प्रति किलो दराचे 5 किलो तांदूळ, 21 रुपये प्रति किलो दराचे 3 किलो गहू आणि 91 रुपये किलो दराने तुरीची डाळ असे तीन प्रकारचे धान्य महिन्यातून एकदाच पॅकिंग ( प्रति पॅकिंगसाठी ४५ रुपये खर्च) करून देण्याबाबत विचार सुरू आहे. यासाठी पालिकेला फक्त 16 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या धान्याचे वाटप पालिका अधिकार्यांच्या देखरेखीखाली होणार आहे. प्रत्येक पाकिटाचे मोजमाप होणार असून चलन बनवून वितरण गटांकडून, नगरसेवकांच्या प्रतिनिधींसोबत आणि एका अँपद्वारे वितरित करण्यात येणार आहे.
शिजवलेल्या अन्न वाटपासाठीचा खर्च शासनाकडून पालिकेला दिला जातो, मात्र धान्य वाटपासाठी तशी तरतूद नसल्याने या धान्य वाटपावरील संपूर्ण खर्च पालिकेलाच करावा लागणार आहे. यामध्ये, तांदूळ व गहू यांची खरेदि ‘एफसीआय’ कडून तर डाळीची खरेदी ‘एफसीएस’ यांच्याकडून करण्यात येणार आहे.
धान्यवाटपामुळे पालिकेचे लाखो रुपये वाचणार आहेत. मनुष्यबळाची बचत होणार आहे. लॉकडाऊनचा हेतू सफल होणार आहे. सदर अतिरिक्त ठरणार्या मनुष्यबळाचा वापर कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी, वैद्यकीय सेवेसाठी होणार आहे.
धान्य वाटप करताना लाभार्थी व्यक्तीचे नाव , पत्ता, आधारकार्ड, मोबाईल नंबर यांची नोंद करण्यात येणार आहे. तसेच, लाभार्थीच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर मतदानाला जशी न पुसली जाणारी शाई लावण्यात येते, तशी शाई लावण्यात येणार आहे.