मुंबई (वृत्तसंस्था) – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली निवडणुकीवेळी देशाच्या सामाजिक ऐक्याला धक्का लावणारा प्रचार केला. अशा व्यक्तींकडून हा प्रचार केला गेल्याने मलाही धक्का बसला. दिल्लीत अशी स्थिती निर्माण होण्याच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करण्याची गरज नाही. सर्वांना माहिती कोण आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
दिल्लीमध्ये सुरू असलेली जाळपोळ याला संपूर्ण केंद्र सरकारच जबाबदार असल्याची टीका शरद पवार यांनी केली. ‘दिल्लीत हवं ते मिळालं नाही त्यामुळेच दिल्लीत आग लावली जात आहे. दिल्ली विधानसभा प्रचारामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा यांसह अनेक मंत्र्यांनी वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण होईल असेच विधानं केली. पण दिल्लीच्या जनतेने मात्र धार्मिक तेढ करणाऱ्यांना साथ दिली नाही,’ असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवसीय शिबिराचा समारोप करताना भाषणात शरद पवार यांनी केंद्र सरकार दिल्लीतील दंगल मुद्दामून करत असून वातावरण खराब करत असल्याचं म्हटलं आहे. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात येत असताना एका विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केले जात आहे की काय? विशिष्ट धर्माच्या लोकांच्या शाळेत घुसून शालेय शिक्षण संस्थांचं नुकसान केले जात आहे,’ अशीही टीका पवारांनी केली.
‘महाविकास आघाडी सरकार किती दिवस चालेल याची चिंता तुम्ही करू नका. जे सरकार होणार नाही असं वाटत होतंं ते तयार झाले. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण वेळ चालेल,’ असं शरद पवार यांनी ठासून सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी बदलण्याचे संकेत शरद पवारांनी दिले. ‘मुंबईमध्ये संघटनात्मक बदल आगामी काळात करावे लागतील. नवीन लोकांना संधी मिळेल. भाकरी फार काळ फिरवली नाही तर करपते. आता भाकरी फिरवावी लागेल,’ असं म्हणत येत्या काळात संघटनात्मक बदलाचे संकेत पवारांनी दिले आहेत.