नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाबाधीतांची संख्या 110 वर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटनांच्या फेडरेशनने सुधारीत नागरीकत्व कायद्या विरोधात देशभर सुरू असलेली शाहीनबागच्या धर्तीवरील आंदोलने मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नवी दिल्लीत कोणत्याही समारंभासाठी 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नसल्याचे जाहीर केले आहे.सर्व जीम, नाईट क्लब, स्पा हे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येतील. विवाह वगळता कोणत्याही कारणासाठी 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. विवाहासाठीसुध्दा आम्ही आवाहन करतो की त्यांना शक्य असेल तर त्यांनी आपले विवाह 31 मार्चपर्यंत पुढे ढकलावेत. हा आदेश धार्मिक समारंभ आणि निदर्शने यांसाठीही लागू आहे, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
का कायद्याच्या विरोधात तामिळनाडूत अनेक ठिकाणी फेडरेशन ऑफ मुस्लिम ऑर्गनायझेशन तर्फे निदर्शने सुरू आहेत. ती मागे घेण्याचे आवाहन या संघटनेने केले आहे. असे असले तरी दिल्लीतील शाहीनबाग आंदोलन मात्र अद्याप मागे घेण्यात आले नाही. दरम्यान, आंदोलन स्थळावर आंदोलकांना मास्क देण्यात येत आहेत. तसेच स्वतंत्रपणे वैद्यकीय तपासणीची सोय केली आहे.शाहीनबागेतील आंदोलन मागे घेण्याचे आवाहन देशातील नामवंतांनी केले आहे. किरण मुजुमदार शॉ, साबा नक्वी आदी मान्यवरांचा त्यात समावेश आहे.