मुंबई (वृत्तसंस्था) – संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे, अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईनं व्यक्त केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री 12.00 वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियातून प्रतिक्रिया देत निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली. सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, निर्भयाचे गुन्हेगार अखेर फासावर लटकले. कायद्याचा सन्मान राखला गेला. येथे कायद्याचे राज्य आहे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा संदेश देणारी ही घटना आहे. या आरोपींची फाशी असे गुन्हे करणाऱ्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे, असे म्हणत निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.