नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशावर कोरोना सारख्या गंभीर आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. असं असताना देखील काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून समाज माध्यमांवर वारंवार चुकीचे संदेश पसरवले जात असून यामुळं नागरिकांमध्ये कोरोनाबाबतची धास्ती अधिकच वाढत आहे. अशाच एका अफवेचे आज प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने बिंग फोडले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या व्हॅट्सऍपवर एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल केली जात असून ही रेकॉर्डिंग जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष व भारतीय आरोग्य मंत्रालय यांच्यातील संभाषणाची असल्याचा दावा केला जातोय. या संभाषणामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण भारत बंद केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या चुकीच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अधिकृत माहिती देताना, सदर रेकॉर्डिंग पूर्ण[पणे बनावट असून अशाप्रकारचा कोणताही संवाद झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.कोरोनासारखे जीवघेणे संकट देशासमोर असताना देखील काही लोकांकडून समाजमाध्यमांवर अफवा पसरवल्या जात आहेत. पोलिसांनी आता आशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कंबर कसली असून समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. आपणास देखील कोरोनाबाबतचा कोणताही संदेश प्राप्त झाल्यास त्याची शहानिशा करूनच तो इतरांना पाठवावा. अन्यथा तुम्ही इतरांकडून आलेला संदेश पुढे पाठवल्याने तुमच्यावरही कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो.