आंध्र प्रदेश (वृत्तसंस्था) – आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये मंगळवारी नदीच्या काठी मंदिरासारखी रचना सापडली आहे. हे ऐतिहासिक शिवमंदिर असल्याचा दावा केला जात आहे. जेव्हा लोक नदीकाठी वाळू उत्खननासाठी खोदत होते, तेव्हा हे मंदिर सापडले. ही घटना पेरुमलापाडू गावाजवळील पेन्ना नदीची आहे. खोदकाम करताना मंदिराचा वरचा भाग दिसला आहे. अशा स्थितीत चारही बाजूंनी माती काढण्याचे काम सुरू आहे.
हे मंदिर २०० वर्ष जुने असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. लोक म्हणतात की, भगवान परशुराम यांनी १०१ मंदिरे बांधली होती. त्यातील एक मंदिर पेन्ना नदीच्या काठावर बांधले गेले होते. सध्या या मंदिराची संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे.
एका संवादात पुरातन विभागाचे सहायक संचालक रामसुब्बा रेड्डी म्हणाले की, पेन्ना नदी आपला मार्ग बदलत असते. अशात हे मंदिर पाण्याखाली गेले असेल. ते म्हणाले की, हे मंदिर कदाचित १८५० च्या पूरात दफन झाले असेल.
गेल्या आठवड्यात ओडिसामध्येही नदीच्या आत असलेले मंदिर पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. लोकांनी नदीच्या आतून ५०० वर्ष जुने भगवान विष्णूचे मंदिर बाहेर येताना पाहिले. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या पुरातनशास्त्रज्ञांच्या पथकाने सांगितले होते की, हे मंदिर त्यांनीच शोधले आहे आणि या मंदिराची रचना पाहिल्यानंतर असा अंदाज वर्तवला जात आहे की ते १५ किंवा १६ व्या शतकातील असेल. या मंदिरात गोपीनाथ यांची मूर्ती बसवण्यात आली होती.







