वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – दक्षिण चीन समुद्र आणि तैवानच्या मुद्यावर अमेरिका आणि चीनमध्ये वाद सुरु असतानाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनला आणखी एक झटका दिला आहे. चीनच्या अडचणी वाढवणाऱ्या विधेयकावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. चीनमध्ये उइगर मुस्लीम आणि अन्य अल्पसंख्यांकाविरोधात सुरु असलेल्या मोहिमेविरोधातील हे विधेयक आहे.
ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या विधेयकानुसार, चीनमधील उइगर मुस्लिम व अन्य अल्पसंख्याविरोधात सुरु असलेल्या मोहिमते सहभाग घेणाऱ्याविरोधात अमेरिका कारवाई करणार आहे. पश्चिम शिनजियांग भागामध्ये उइगर आणि अन्य अल्पसंख्यांक नागरिकांवर देखरेख ठेवणाऱ्या आणि त्यांना ताब्यात घेणाऱ्या चीनच्या अधिकाऱ्यांना अमेरिकेत प्रतिबंध घालण्यात येणार आहे. चीनमध्ये जवळपास एक लाख अल्पसंख्याक नागरिकांना शिबीरात ठेवण्यात आले आहे. या छळाविरोधात चीन विरोधात पाऊल उचलणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे.
उईगरांच्या अधिकारासाठी लढणारे नुरी टर्केल यांनी ट्रम्प यांचे आभार मानून हा दिवस महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. उइगर मुस्लिम हे चीनसाठी धोका असल्याची भूमिका चीनने मांडली. चीनने या समुदयातील नागरिकांवर दाढी वाढवणे आणि बुरखा घालण्याच्या मुद्यावर कारवाई केली. तसेच या समुदायाशी निगडीत अनेकांना अज्ञात स्थळी डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे.
या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प यांना अमेरिकन संसदेला एक अहवाल सादर करावा लागणार आहे. यामध्ये उइगर मुस्लिमांचा छळ करणारे अधिकारी, शिनजियाग प्रांतातील अल्पसंख्यांक नागरिकांचे मानवाधिकार, अल्पसंख्यांकाचा छळ करणे, कोणत्याही आरोपाशिवाय त्यांना तुरुंगात डांबणे आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती द्यावी लागणार आहे. या अधिकाऱ्यांची संपत्ती अमेरिकेत असेल तर ती संपत्ती अमेरिका सील करण्याची कारवाई करू शकते.