जळगाव (प्रतिनिधी) – देशभरात तसेच राज्यामध्ये करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव होत असल्याच्या घटना आढळून येत आहेत. खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये याकरीता नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात जेथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे अशी सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने निर्गमित केले आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांना सूचित केले आहे.
तसेच सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात कोरोना बाधीत/संशंयीत रूग्ण आढळून आल्यास त्याला तात्काळ पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच लोकांमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावोगावी जजजागृती करावी आणि आपआपल्या क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकता नसेल तेव्हा प्रवास टाळणे, शिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यास सांगावे. अशा सूचना अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.