नवीदिल्ली (वृत्तसंस्था) –कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं असून या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यांतून कोरोना व्हायरसचे नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 138वर पोहोचली आहे. दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोविड-19 मुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 137 कोरोनाबाधित असून त्यापैकी 24 एनआरआय आहेत.
कोरोमा व्हायरसमुळे संसर्ग झालेल्यांमध्ये 113 भारतीय नागरिक आहेत. त्यातील 14 रूग्ण बरे झाले आहेत. दिल्लीमध्ये आठ रूग्ण असून त्यापैकी दोनजण ठिक झाले आहेत. कर्नाटकमध्ये एकूण 8 रूग्ण असून त्यापैकी एक रूग्ण ठिक झाला आहे, केरळमध्ये 26 रूग्ण असून त्यापैकी तीन जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. उत्तरप्रेदशमध्ये एकूण 15 रूग्ण आढळले असून त्यापैकी 5 जण ठिक झाले आहेत. तर महाराष्ट्रात तीन विदेशी नागरिकांसह 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लढाखमध्ये 6, जम्मू आणि काश्मीरमध्ये 3 आणि तेलंगणामध्ये 5 रूग्ण आहेत. राजस्थानमध्ये दोन विदेशी नागरिकांसह एकूण 4 लोकांना संसर्ग झाला आहे. तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. ओडिशामध्ये सोमवारी कोविड-19 ची लागण झालेला एक रूग्ण आढळून आला होता.