पुणे (वृत्तसंस्था) – जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. सर्वप्रथम चीनमधील वुहान शहरामध्ये सापडलेल्या या कोरोना विषाणूने आता भारतात देखील प्रवेश केला असून देशभरामध्ये आतापर्यंत २ रुग्णांना या विषाणूच्या संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. अशातच कोरोना विषाणूमुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही समाजकंटक समाजमाध्यमांद्वारे कोरोनाविषयक चुकीची माहिती पसरवून संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांनी आज समाजमाध्यमांवर कोरोनाविषयक खोटी माहिती देणारा व्हिडीओ शेअर केल्याने एकास अटक केली आहे. याबाबत पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना, ‘सदर इसम समाजमाध्यमांवर कोंबडीचे मास खाल्ल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतो अशी खोटी माहिती पसरवत असल्याचे आढळल्याने त्यास अटक करण्यात आली.’ अशी माहिती दिली.अनेकवेळा आपण समाजमाध्यमांद्वारे प्राप्त झालेली माहिती कोणतीही पडताळणी न करता इतरांना पाठवत असतो. मात्र सध्या देशावर कोरोना विषाणूचे संकट ओढवले असल्याने कोरोनाबाबत पसरवण्यात येणाऱ्या माहितीवर पोलिसांची करडी नजर असून चुकीची अथवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास आपणही योग्य पडताळणी करूनच ती माहिती पुढे पाठवावी अन्यथा तुम्ही फॉरवर्ड केलेला चुकीचा मेसेज तुम्हाला जेलची वारी घडवू शकतो.