मुंबई (वृत्तसंस्था) – आमची छाती फाडली तरी आमच्या छातीत राम दिसेल, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून कडाडून टीका करण्यात आली आहे. ‘शिवसेना हिंदुत्व सोडत नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकारही चालवते आहे, हे कदाचित भाजपला सलत आहे. त्यामुळे ते टीका करतात असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमची असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एवढंच नव्हे तर पुढे चंद्रकांत पाटील ह्यांना कोणी सांगायला हवं की,’शिवसेनेनं हिंदुत्वाची धार कुठेही कमी केली नाही, भाजपने याच स्वागत करायला हवं, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे.
शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरे ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. सरकारमधील पक्षांच्या विचारधारा वेगळ्या असतीलही, पण लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणे,सगळ्यांना समान न्याय देणे हा मानवता धर्म म्हणजेच राजधर्म असतो. त्या राजधर्माचे पालन श्रीरामाने केले. तोच राजधर्म महाराष्ट्रात चालवला जात आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत. काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही. त्यामुळे विरोधक बेजार झाले आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला सातत्याने लक्ष्य करत आहेत. मध्यंतरी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला होता. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हायलाच पाहिजे. आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते.