मुंबई (वृत्तसंस्था) – आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता इरफान खान सध्या कॅन्सरशी झुंज देतोय. न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या दुर्मिळ कॅन्सरशी झुंज देत असलेला इरफान कमबॅक करेल की नाही, असा प्रश्न चाहत्यांना सतावत होता. पण इरफान जिगरबाज निघाला. वर्षभराच्या उपचारानंतर त्याने पडद्यावर कमबॅक केले. होय, त्याचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा आज रिलीज झाला. आता इरफानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. होय, त्याचा आणखी एक सिनेमा ‘अपनों से बेवफाई’ हा सिनेमा येत्या 2 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.’अपनों से बेवफाई’चे दिग्दर्शक प्रकाश भालेकर यांनी स्वत: याचा खुलासा केला. ‘अपनों से बेवफाई’ हा सिनेमा दीर्घकाळापासून बनून तयार होता. होय, इरफानला कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच तो शूट झाला होता. पण याऊपरही त्याचे प्रदर्शन लांबले होते. असे का तर पैशांची अडचण.
भालेकर यांनी सांगितले की, ‘अपनों से बेवफाई’ हा एक मनोरंजक चित्रपट आहे. इरफानने यात अतिशय उत्तम काम केलेय. तो यात मुख्य भूमिकेत आहे. यात काही नवे चेहरेही आहेत. चित्रपट बनून तयार होता. पण आम्ही रिलीज रोखून धरले होते. कारण आमच्याकडे फंडची कमतरता होती. पण आता आमचा हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
इरफान गत दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देतोय. अद्यापही तो पूर्णपणे बरा झालेला नाही. 2017 च्या जून महिन्यात त्याला कॅन्सरचे निदान झाले होते. यानंतर काम मध्येच सोडून इरफान उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाला होता.अलीकडे इरफानने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने ‘अंग्रेजी मीडियम’चे प्रमोशन करू शकत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. मी तुमच्यासोबत आहे आणि नाही सुद्धा… अशा त्याच्या या व्हिडीओतील शब्दांनी चाहत्यांचे डोळे पाणावले होते.