जळगाव ( प्रतिनिधी ) –पिंगळवाडे, ता. अमळनेर, पिंगळवाडे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आज मौखिक आरोग्य, दंत चिकित्सा व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामविकासात रचनात्मक कार्य करताना आरोग्याला प्रथम स्थान आहे. प्राथमिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक आजार गंभीर रूप धारण करतात. हे ओळखून पिंगळवाडे गावात शालेय विद्यार्थ्यांसाठी मौखिक आरोग्य जनजागृती, दंत तपासणी व उपचार कार्यक्रम राबविण्यात आला.
मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम समजावून दंत तपासणी करून पालकांना उपचारासंदर्भात सल्ला देण्यात आला. योग्य वयातच मुलांची जडणघडण होत असते, त्यात शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व विशद करण्यात आले. मुलांना दात स्वच्छ करण्याची चांगली सवय लागावी म्हणून मोफत टूथब्रश आणि टूथपेस्ट देण्यात आले.
या शिबिरात आश्रमशाळेतील 289 विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना दात घासण्याचे योग्य प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरानंतर सर्व विद्यार्थ्यांना टूथब्रश व पेस्ट किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी इंडियन डेंटल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, माजी सरपंच मंगलाबाई बाळासाहेब देशमुख, माजी उपसरपंच समाधान पारधी, ग्रा.पं. सदस्य अतुल पाटील, श्री. भास्कर पाटील, उपमुख्यध्यापक दिपक राणे सर, विजय पाटील सर, शिक्षकवृंद व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सुर्यवंशी यांनी केले.
शिबिर यशस्वीतेसाठी जैन फार्म फ्रेश फुड चे राहुल चव्हाण, गांधी रिसर्च फौंडेशन चे विक्रम अस्वार यांनी सहकार्य केले. हा उपक्रम नेस्ले कंपनी च्या RSP प्रकल्प, जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.










