जळगाव शहरात शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात झाडावरील बगळा पक्षी मांजा दोऱ्यात अडकल्याचे दिसून आल्यावर तत्काळ नागरिकांनी वन्यजीव संस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. मनपाच्या अग्निशमन दलाच्या मदतीने या बगळ्याची मांजातून सुटका करून प्रथमोपचार करण्यात आले.
आज शुक्रवारी दि. १ रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास वन्यजीव संरक्षण संस्थाचे सचिव योगेश गालफाडे यांना निलेश पाटील यांच्या फोनवरून श्याम मुखर्जी उद्यान मध्ये एका झाडावर बगळा पक्षी मांजामध्ये अडकल्याबाबत सांगितले. गालफाडे व मयूर वाघूळदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जवळजवळ ७० फुट उंच झाडावर बगळा पक्षी मांजात अडकला असल्याचे त्यांना दिसून आले. तातडीने त्यांनी महापालिकेची अग्निशामक दलाचे वाहन बोलाविण्यात आले. अग्निशमक वाहनमधील शिडीवर कर्मचारी अश्वजीत घारगे, योगेश गालफडे, मयूर वाघूळदे यांनी चढून सर्वप्रथम बगळ्यास खाली उतरवून अडकलेला मांजा पूर्णपणे बाजूला केला. त्यानंतर त्याला पाणी पाजले व प्राथमिक उपचार देखील केले. उपचारानंतर सुखरूपपणे मांजात अडकलेल्या बगळ्यांनी निसर्गात झेप घेतली.