जळगाव (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृहाशी संबंधित कर्मचारी वर्ग व रंगकर्मी यांना आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी लवकरच महाराष्ट्र शासनाकडे आम्ही भरीव अशा मदतीची मागणी करणार आहोत, अशी माहिती अ.भा. नाट्य परिषदेच्या जिल्हा शाखेच्या अध्यक्ष अँड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी दिली.
शहरातील रंगकर्मी व रसिकांसमवेत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस कोविडसंदर्भातील सर्व नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर व नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शहराचे आ. राजूमामा भोळे, महापौर भारतीताई सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, नगरसेवक अनंत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
नटराज पूजन व रंगभूमी पूजन झाल्यावर परिषदेचे कार्यकारिणी सदस्य शरद पांडे यांनी नांदी म्हटली. मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, जागतिक मराठी रंगभूमीच्या सर्व नाट्यकलावंत व नाट्यरसिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देत असताना कोविड काळातील आरोग्यविषयक नियम पाळणेही अत्यावश्यक असल्याचे महत्वाचे आहे. आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर नाट्यगृह उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल शासनाचे आभारही त्यांनी मानले.
कार्यक्रमात शहराचे आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, नगरसेवक अनंत जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष शंभू पाटील यांनी केले. रंगभूमीपूजनानिमित्त शहराच्या महापौर भारतीताई सोनवणे, उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, कोषाध्यक्ष प्रा.शमा सराफ यांच्यासह जळगावातील चिंतामण पाटील, पियुष रावळ, शरद पांडे, प्रविण पांडे, प्रा.राजेंद्र देशमुख, ॲड.पद्मनाभ देशपांडे, ललित पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे रत्नाकर पाटील, किरण सोहळे, अरुण सानप, पुरुषोत्तम चौधरी, विनोद ढगे, अनिल मोरे, भुसावळचे रंगकर्मी अनिल कोष्टी, सुरेश बारी, राज्य नाट्य समन्वयिका सरिता खाचणे, मायटी ब्रदर्सचे मिलिंद थत्ते, होरीलसिंग राजपूत आदी रंगकर्मी उपस्थित होते.