पारोळा (प्रतिनिधी) – नाल्यातील डोहाच्या पाण्यात गटांगळ्या खाणार्या मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात तालुक्यातील लोणी येथील तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली
लोणी बुद्रुक व लोणी खुर्द या दोन्ही गावांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावर एक लहान पुल असून दोन्ही गावातील ग्रामस्थ ये-जा करण्यासाठी या पुलाचा वापर करत असतात. या पुलाची आता दयनीय अवस्था झाली आहे पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. सध्या सुरू असणार्या पावसामुळे या पुलाखाली असलेल्या नाल्यातील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे
याच ठिकाणी शनिवारी दुपारी लोणी येथील दीपक भील व त्याचे काही मित्र गेले होते. यावेळी किशोर दिनकर हा तरुण पाय घसरून पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दीपक भील याने पाण्यात उडी घेतली. मात्र त्याचाच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत दीपकवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.