एसीबी कार्यालयात नोंदवून घेतला जबाब
जळगाव (प्रतिनिधी) :- बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठीच्या लाच प्रकरणात सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात आयुक्त आणि नगर रचना अधिकारी यांचे नाव समोर आले होते. दरम्यान यातील रचना अधिकारी यांची मंगळवारी चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज बुधवारी महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. या चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण जळगाव महानगरपालिकेत मंजुरीसाठी टाकले होते. नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात २१ हजारांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये देण्याचे ठरले, तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले, असे एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांना रंगेहात पकडण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांचे नाव देखील समोर आले होते. त्यामुळे बुधवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हजर झाले.