मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात शनिवारी 8 हजार 348 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील बाधितांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा ओलांडला. करोना संसर्गाने आणखी 144 बाधित दगावले. त्यामुळे राज्यातील करोनाबळींची संख्या 11 हजार 596 इतकी झाली.

देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. राज्यातील बाधित करोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. करोनाचा संसर्ग झालेले आणखी 5 हजार 306 रूग्ण एका दिवसात बरे झाले. त्यामुळे राज्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 65 हजार 663 इतकी झाली आहे.
राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.05 टक्के, तर करोना मृत्यूदर 3.85 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 26 हजार 926 सक्रिय बाधित आहेत. राज्यातील करोनाविषयक चाचण्यांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात 15 लाख 22 हजार 564 चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान, राज्यात सर्वांधिक बाधित असणाऱ्या मुंबईने शनिवारी 1 लाखाचा टप्पा पार केला.







