अबू धाबी ( वृत्तसंस्था ) – अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध भारताने ६६ धावांनी मोठा विजय मिळवला या विजयाने त्यांचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग थोडा सोपा बनला आहे.
भारतीय संघाचे अजून २ सामने बाकी असून नामिबिया आणि स्कॉटलँड संघांशी त्यांचा सामना होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी स्कॉटलँड, ८ नोव्हेंबर रोजी नामिबियाविरुद्धचा सामना होणार आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाला हे दोन्हीही सामने मोठ्या अंतराने जिंकावेच लागणार आहेत. टी२० विश्वचषक २०२१ ची सुरुवात भारतीय संघासाठी निराशादायी होती . प्रथम पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंड संघांनी भारतीय संघांवर मात केली. बुधवारी भारतीय संघाने विजयाचे खाते उघडले
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा फलकावर लावल्या सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागिदारी रचली होती. पुढे त्यांच्या विकेट गेल्यानंतर हार्दिक पंड्या (३५ धावा) आणि रिषभ पंत (२७ धावा) यांनी विस्फोटक फलंदाजी करत संघाची धावसंख्या २०० पार नेली.
भारताच्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून फक्त करीम जनत (नाबाद ४२ धावा) आणि कर्णधार मोहम्मद नबी (३५ धावा) मोठ्या खेळी करू शकले. परिणामी २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसाना अफगाणिस्तानचा संघ १४४ धावाच करू शकला आणि भारतीय संघाने ६६ धावांच्या फरकाने सामना खिशात घातला.
भारतीय संघाच्या खात्यात २ गुणांची नोंद झाली आहे. नेट रन रेटमध्येही चांगली वाढ झाली सध्या भारतीय संघ -१.६०९ वरुन ०.०७३ च्या नेट रन रेटवर आहे गट २ मधील संघांच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. अजून त्यांच्यापुढे न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघांचे आव्हान असेल. न्यूझीलंड संघ ३ पैकी २ सामने जिंकत ४ गुण आणि ०.८१६ नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानी अफगाणिस्तान संघ ४ पैकी २ सामने जिंकत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नेट रन रेटमुळे अफगाणिस्तानचा संघ या स्थानी असला तरीही भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्यांच्या नेट रन रेटमध्ये (१.४८१) घट झाली आहे.
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघांचे गुण भारतापेक्षा फक्त २ अंकांनी जास्त असल्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या अपेक्षा अजूनही जिवंत आहेत. ७ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावरही भारतीय संघाच्या आशा टिकून असतील.
अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर तिनीही संघांचे समान ६ गुण होऊ शकतात. अशावेळी नेट रन रेटच्या जोरावर उपांत्य फेरीचा दुसरा संघ निश्चित होईल. न्यूझीलंडने हा सामना जिंकला तर अफगाणिस्तानचा प्रवास तिथेच संपेल.