जळगावच्या पिंप्राळा बाजारातील घटना
जळगाव (प्रतीनीधी) : दुचाकी लावत असताना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि. १५ जून रोजी घडली आहे. ही घटना दादावाडी जवळील बोगद्याखाली घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेश शिवाजी पाटील (५०, रा. हिराशिवा कॉलनी, खोटे नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
राजेश पाटील हे बुधवार दिनांक १२ जून रोजी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी ते दादावाडी येथील बोगद्याजवळ दुचाकी उभी करत असताना त्यांचा तोल जावून ते जमिनीवर पडले.
त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी १५ जून रोजी मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आहेत.