शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुनंदिनी पार्क येथे घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी १ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना दिनांक १४ जून ते १६ जून दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश भगवान भालेराव (४४, रा. सुनंदिनी पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. दिनेश यांची मुलगी इगतपुरी येथे गेली होती. तिला घेण्यासाठी दिनांक १४ जून रोजी दिनेश भालेराव हे कुटुंबीयांसह गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ५० हजार रोकड, सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.
दिनांक १६ रोजी पहाटे साडेचार वाजता भालेराव हे घरी परतले त्या वेळी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.