मुंबई (वृत्तसंस्था) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी कसोटीपटू सुनील जोशी यांची निवड केली असली तरी त्यामागे कर्णधार विराट कोहली याच्या गुडबुकमध्ये असल्याचा जोशी यांना लाभ झाल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद तसेच सदस्य गगन खोडा यांची मुदत संपल्याने समितीतील दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यासाठी मंडळाने नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने या पदासाठी अर्ज मागविले होते व त्यातून काही नावे शॉर्टलिस्ट करून पाच जणांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले होते. त्यात जोशींचा स्पष्टवक्तेपणा निर्णायक ठरल्यानेच त्यांची नियुक्त केल्याचे मंडळाने जाहीर केले होते. मात्र, पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्याचे उघड होत आहे. निवड समितीचे अध्यक्ष म्हणून सुनील जोशी तर, सदस्य म्हणून हरविंदर सिंग यांची निवड करण्यात आली आहे. कोहली व जोशी यांचे खूप जुने कनेक्शन आहे. 2008 व 2009 साली जोशी आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळले आहेत. त्याच संघाचा कोहली कर्णधार होता. त्यावेळी कोहली व जोशी यांच्यात चांगली मेत्री तयार झाली. हीच मेत्री जोशी यांच्या नियुक्तीसाठी मोलाची ठरल्याचीही चर्चा आहे.
जोशी यांनी 1996 साली भारतीय संघात पदार्पण केले होते. 15 कसोटी व 69 एकदिवसीय सामने खेळण्याची त्यांना संधीही मिळाली. 2011 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.