मुंबई (वृत्तसंथा) – महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी सन्मान योजना राबवीत कर्जमाफी जाहीर केली आहे. प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीत मोठा घोळ समोर आला आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मृत शेतकऱ्यांचाही समावेश आहे. आधारकार्डची सक्तीही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँकेतील आधार क्रमांक आणि प्रत्यक्षातला आधार क्रमांक वेगळा आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असूनही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३५ लाख शेतकर्यांपैकी केवळ १५ हजार ५५८ शेतकऱ्यांची पहिली यादी सरकारने जाहीर केली होती. अंमलबजावणीत कोणताही घोळ होऊ नये, यासाठी सरकारने टप्याटप्याने लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्याचे ठरवले होते. त्यासाठी मार्च ते एप्रिल हा तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. दुसऱ्या यादीत तब्बल २२ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.