विदयार्थ्यांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- शैक्षणीक वर्ष २०२४-२५ वर्षात १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासगवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. विदयार्थ्यांनी अर्ज दाखल करावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी केले आहे.
यापूर्वी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर २०२४ होती. मात्र जिल्हयातील अनेक विदयार्थ्यांनी त्यांचे अर्ज आजपर्यंत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात दाखल केले नाहीत अशा विदयार्थ्यांकरीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रमानुसार ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणीक व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्ग (मराठा) या मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांना जात पडताळणी करावी लागते.
बारावी विज्ञाननंतर वैदयकीय, अभियांत्रीकी, आर्किटेक्चर, औषधनिर्माण, विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन आदी, व्यावसायिक अभ्यासक्रमांस राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी तसेच प्रवेश घेतल्यानंतर सरकारचा शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती, योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. अशा विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेऊन जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. त्यामुळे ज्या विदयार्थ्यांनी त्यांचा जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल केला नाही त्यांनी सी.सी.व्ही.आय.एस किंवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत व त्याची छापील प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव कार्यालयात दाखल करावी. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी केले आहे.