ज्येष्ठ नागरिकांनी सहा तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जळगाव मधील पात्र ८०० ज्येष्ठ नागरिक नुकतेच अयोध्या दर्शनासाठी गेले आहेत. आता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे जाण्यासाठी ६ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी अर्ज करावेत असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरीक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयासाठी १००० लाभार्थ्याचे उदिष्ट देण्यात आलेले आहे. पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे स्थळ निश्चीत करण्यात आले होते. सदर स्थळी जाण्यासाठी ८०० लाभार्थ्याची निवड करण्यात येवून ३० ऑक्टोबर २०२४ रोजी लाभार्थी श्रीराम मंदिर, अयोध्या येथे तीर्थ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. उर्वरीत २०० लाभार्थ्यांसाठी महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर हे स्थळ निश्चीत करण्यात आले आहे. जे नागरिक या तीर्थ क्षेत्रास जाण्यास इच्छुक आहेत. त्यांनी रविवार दि.६ रोजी संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यत विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव येथे सादर करावेत. शासकीय सुटीच्या दिवशी देखील अर्ज स्विकारले जातील याची नोंद घ्यावी.
अर्जासोबत अर्जदाराचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचा पुरावा, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लक्षपर्यत असणे अनिवार्य), शासकीय वैदयकीय अधिका-यांनी दिलेला शारीरीक दृष्टया निरोगी आणि प्रस्तावीत प्रवासासाठी सक्षम असलेचे वैदयकीय प्रमाणपत्र व अर्जात नमूद आवश्यक कागदपत्रे सादर करावेत. सदर योजनेचे अर्ज गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत व सहायक आयुक्त, समाज, कल्याण, कार्यालय जळगाव येथे उपलब्ध आहेत. यापूर्वी ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज सादर केले आहेत. तथापी ज्यांची निवड झालेली नाही अशा व्यक्तींचे अर्ज या तीर्थ क्षेत्रासाठी निवड करतांना विचारात घेण्यात येणार आहेत, त्यामुळे त्यांनी पुनश्चः अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. उदिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्याची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. तरी इच्छुक जेष्ठ नागरीकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.