बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मलकापूर (प्रतिनिधी) : व्याजाच्या पैशाला कंटाळून येथील चांडक विद्यालयातील प्रयोगशाळा परिचर कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान उपचारादरम्यान पाचव्या दिवशी दि. १९ जून रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
चैनसिंग अमरसिंह चव्हाण (वय ५५, रा. वृंदावन नगर, मलकापूर) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते लि. भो. चांडक विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते. त्यांनी दि. १३ जून रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवार दि. १९ जून रोजी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी त्यांचा मुलगा सचिन चैनसिंग चव्हाण यांनी १८ जून रोजी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. चैनसिंग चव्हाण यांना रामेश्वर पाटील यांनी ३ हजार रुपये व्याजाने दिले होते. त्यावरील व्याजाच्या पैशांसाठी घरी येऊन, फोनवरून व समक्ष धमक्या देत पैशाची मागणी करीत होते. चैनसिंग चव्हाण यांना ते चांडक विद्यालयात जावून जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.
तसेच माझे सुद्धा चारचाकी वाहन अडवून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने धमक्या दिल्या व आत्महत्येस प्रवृत्त केले. या प्रकरणी पोलिसांनी सचिन चैनसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रामेश्वर पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, स्वप्निल भगत व आणखी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी देवराम गवळी घटनेचा तपास करीत आहेत.