सोयगाव तालुक्यातील वणगाव येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : शेतात वखर चालवताना जमिनीवरुन दुसऱ्या शेतात गेलेली विजेची वायर तुटली. त्याचा स्पर्श वखरला झाल्याने विजेचा जोरदार धक्का लागून एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवार दिनांक २८ जून रोजी सकाळी पाचोरा तालुक्यालगतच्या सोयगाव तालुक्यातील वणगाव येथे घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने सोयगाव पोलिस स्टेशनकडे वर्ग केली आहे.
प्रमोद विष्णू जंजाळ असे मयत तरुणाचे नाव आहे. हा होतकरू तरुण शिक्षणासोबतच वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा. शुक्रवारी सकाळी शेतात वखर चालवायचे असल्याने आई, वडील व प्रमोद हे शेतात आले होते. प्रमोदही हा शेतात लोखंडी वखर चालवत असताना त्यांच्या शेतातून शेजारील शेतासाठी विजेची वायर जमिनीवरुन टाकण्यात आली होती. ही वायर प्रमोद याच्या निदर्शनास आली नाही.
नेमके वखरमुळे वायर तुटली व वायरच्या तारांचा स्पर्श वखरला झाला. प्रमोद याच्या हातात वख्खरचा दांडा असल्याने प्रमोद यास विजेचा जोरदार शॉक लागला. त्याला पाचोरा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकुलता एक मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांनी आक्रोष केला. घटनेचे पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.