जळगाव( प्रतिनिधी) – भाजपच्या 29 नगसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केल्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला आहे. तसेच बंडखोर नगरसेवकांनी त्यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या कुलभूषण पाटील यांना मतदान करून उपमहापौर पदी विराजमान केले आहे या सर्व नाट्यमय घडामोडी नंतर आता पालिकेच्या राजकारणाला एक नवीन वळण आले आहे.
ज्या भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली त्यांनी आता आपल्यावर अपात्रतेची कारवाई होईल म्हणून यु टर्न घेतला असून आम्ही भाजपाचेच आहोत आम्ही पक्ष सोडला नसून आम्ही फक्त सेनेच्या उमेदवाराला मतदान केले आहे, आणि उपमहापौर पदासाठी भाजपच्याच उमेदवाराला मतदान केल्याचे बंडखोर नगरसेवकांकडून सांगण्यात आले. तसेच बंडखोर नगरसेवकांनी मंगळवारी बैठक घेऊन मनपाच्या गटनेते पदी दिलीप पोकळे व उपगटनेते पदी चेतन संनकत यांची निवड देखील केली आहे, मात्र, सदर निवड बेकायदेशीर असून बंडखोरी करणारे हे भाजपचे नसून भाजपने त्यांच्यावर आपत्रतेची कारवाईसाठी विभागीय आयुक्त यांच्या कडे अपील केल्याचे भाजप महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले