मुंबई (वृत्तसंस्था ) ;- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे डॉ.जलील पारकार यांनी ही माहिती दिली. आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या जुहूमधल्या कबरस्तानात त्यांचं दफन करण्यात येईल.
बुधवारी (7 जुलै) सकाळी 7.30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं पारकर यांनी सांगितलं. वृद्धापकाळातील समस्यांमुळे दिलीप कुमार यांचे निधन झाल्याचं डॉ. पारकर यांनी बोलताना सांगितलं.
दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या महिन्यात सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांना रविवारी (6 जून) सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.
दिलीप कुमार यांच्या ट्वीटर हँडलवरुन सकाळी आठ वाजता त्यांचे निधन झाले असल्याची माहिती जाहीर करण्यात आली. त्याचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी ही माहिती दिली.
दिलीप कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
दिलीप कुमार यांना श्रद्धांजली
‘दिलीप कुमार यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला,’असं म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केलं. दिलीप कुमार यांच्या जाण्याने कलाविश्वाचं मोठे नुकसान झाल्याचंही ते म्हणाले.
महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटलं, “भारतीय सिनेमाचा इतिहास दिलीप कुमार यांच्याआधी आणि त्यांच्यानंतर असाच लिहिला जाईल.”
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलंय. ‘तुमच्यासारखं दुसरं कोणीही होऊ शकणार नाही. भारतीय सिनेमासाठीचं तुमचं योगदान अतुलनीय आहे,’ असं म्हणत सचिनने आदरांजली व्यक्त केली आहे.