पिंपरी – कोणत्या तरी अवजड वस्तूने प्रहार करून महिलेचा खून करण्यात आला. ही घटना काळेवाडी येथे शुक्रवारी (दि. १६) पहाटे उघडकीस आली. छाया पांडूरंग गुंजाळ (वय ५५, रा. तुळजा भवानी कॉलनी, काळेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया या त्यांच्या घरात झोपल्या होत्या. पहाटे चारच्या सुमारास शेजाऱ्याने पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी छाया यांना आवाज दिला.
त्यानंतर सव्वा पाच वाजताच्या सुमारास छाया या जखमी अवस्थेत दिसून आल्या. त्यांच्या डोळ्यावर कोणत्यातरी अवजड वस्तूने प्रहार केला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
छाया यांच्या घरात दोन सासू, पती, मुलगा, सून आणि सुनेच्या बाळंतपणासाठी आलेली तिची आई असे सर्वजण घरी होते. सुनेच्या आईलाही मारहाणीत दुखापत झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हा खून कोणी आणि कशासाठी केला हे समजू शकले नाही.