सिमेंटच्या कंपाऊंडची जाळी तोडून चोरट्यांचा कारखान्यात प्रवेश; उत्पादन कक्षातील २० नग लीड इंगट घेऊन पोबारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजेपासून ते १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. जळगाव एमआयडीसी भागातील ई-सेक्टर, गोपालदास मिल चौकाजवळील ‘आनंद बॅटरी’ कंपनीत चोरट्यांनी प्रवेश केला.
चोरट्यांनी कंपनीच्या सिमेंटच्या कंपाऊंडला असलेली जाळी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर उत्पादन कक्षाजवळ असलेल्या अंदाजे दीड फूट छिद्रातून आत जाऊन तेथे ठेवलेला लीड इंगटचा माल चोरून नेला.
चोरीस गेलेल्या मालामध्ये शिशाचे २० नग लीड इंगट असून प्रत्येक इंगटचे वजन सुमारे २५ किलो आहे. अशा प्रकारे एकूण ५०० किलो वजनाचा माल चोरून नेण्यात आला. या कच्च्या मालाची किंमत सुमारे २५० रुपये प्रतिकिलो असल्याने चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत १ लाख २५ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कंपनीच्या मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा
याप्रकरणी लखन वासुदेव बुधाणी (वय ५०, व्यवसाय उद्योग, रा. घर क्र. १४४, सिंधी कॉलनी, कंवर नगर, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३३४(१) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २.३९ वाजता नोंदविण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. कंपनी परिसरातील हालचाली, प्रवेशाचा मार्ग आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे. जळगाव पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी गुन्हे व चोरीसंबंधी विविध सेवा उपलब्ध असल्याचे नमूद आहे.









