जळगाव (प्रतिनिधी) – शिरसोली गावाजवळील वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४१५ मधील राखीव वनातून ८ हजार रूपये किंमतीचे लोखंडी अँगल चोरून नेणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी जळगाव शहरातून अटक केली आहे. गुरूवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ४१५ मधील राखीव वनातून आठ हजार रूपयांचे कंपाउंडचे लोखंडी अँगल चोरल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पोलिस कर्मचारी प्रदीप पाटील, स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी संशयित आरोपी पांडूरंग फकीरा पाटील (रा.वाटीका आश्रम, जळगाव), पंकज शरद पवार (रा. द्वारका नगर, जळगाव) आणि मुकेश भास्कर गायकवाड (रा. दादावाडी,जळगाव) यांनी लोखंडी अँगल चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी ७ डिसेंबर रोजी तिन्ही आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. गुरूवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.