संशयित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी आणल्यावर घडली घटना ; जळगावातील दुपारचा प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी कोर्टाच्या परवानगीने आज गुरुवारी दि. ४ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आणण्यात आले होते. यावेळी त्याने पोलिसांची नजर चुकवून रुग्णालयातून फरार झाला होता. मात्र साधारण दोन तासांनी त्याला एलसीबी कर्मचाऱ्याच्या चाणाक्ष नजरेने शिताफीने पकडून पुन्हा जिल्हा कारागृहात जमा करण्यात आले.
सॅन्डल घेण्याच्या बहाण्याने सख्या मामाने नऊ वर्षीय भाचीला शेतात नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना दि. ३० जून रोजी चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली होती. चिमुकलीने मामाच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला व जवळच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना हा प्रकार सांगितला.(केसीएन)परिसरातील ग्रामस्थांनी नराधम मामाला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे मामा समाधान उर्फ सोमा अभिमान भिल्ल (वय २४) याच्यावर विनयभंग व पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
समाधान भिल याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानुसार तो जळगावच्या जिल्हा कारागृहात होता. दरम्यान, समाधान भिल्ल याचे वय निश्चितीकरिता ताबा मिळावा म्हणून मेहुणबारे पोलीस स्टेशनने न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने जिल्हा कारागृहाला वय निश्चितीच्या वैद्यकीय तपासणीसाठी समाधान भिल्ल याचा ताबा देण्याबाबत आदेशित केले होते.(केसीएन)त्यानुसार मेहुणबारे पोलीस स्टेशनचे हवालदार अरुण पाटील व राकेश काळे यांनी त्याचा कारागृहातून ताबा घेत त्याला दुपारी ३ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय तपासणीला आणले होते.
रुग्णालयात पोलीस हे कागदपत्रांची कार्यवाही करीत असताना तेथून समाधान भिल्ल याने पळ काढला. यावेळी पोलीस गांगरून गेले. मात्र त्याचा शोध सुरु केला.(केसीएन) याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) कळविण्यात आले. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास एलसीबीचे पोहेकॉ सुधाकर अंभोरे यांच्या चाणाक्ष नजरेला संशयित आरोपी समाधान भिल्ल हा रुग्णालयामागील भजे गल्लीत पायी चालत असताना दिसला. त्याचा पाठलाग केला असता तो एका बंद रिक्षात बसत होता. मात्र त्याचवेळी अंभोरे यांनी त्याला झडप घालून पकडले.
त्याला एलसीबीच्या कार्यालयात आणले असता तेथे मेहुणबारे स्टेशनचे कर्मचारी हवालदार अरुण पाटील व राकेश काळे यांनी ओळखले. त्यांच्यासह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी समाधान भिल्ल याला लगेच ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा कारागृह येथे जमा केले आहे.(केसीएन)संशयिताला अटक करण्याकामी एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, नाईक किरण चौधरी यांनी कारवाई केली आहे. दरम्यान, संशयित आरोपी पळल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र संशयिताला शिताफीने अटक केल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे.