शिरसोलीच्या माहेरवाशिणीचा प्रसूतीपश्चात मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील माहेरवाशिणीला प्रसूतीपश्चात झटके आल्यामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना पाचव्या दिवशी शुक्रवारी दि. १७ मे रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला. महिलेला मुलगा झाला असून तो सुखरूप आहे. यामुळे महिलेच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.
आरती किशोर बोडखे (वय २५, रा. रहिमाबाद ता. सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती किशोर हे एका कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. आरती यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, नुकतेच झालेले बाळ असा परिवार आहे. त्यांना पहिल्याच प्रसूतीसाठी माहेरी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे आणण्यात आले होते.
प्रसूतीकळा सुरु झाल्या तेव्हा त्यांना जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरती यांचे सिझेरियन झाल्याने त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र प्रसूतीपश्चात सदरहू महिला हिला झटके येत असल्यामुळे व प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात दि. १३ मे रोजी उपचारासाठी ठेवण्यात आले होते.
अतिदक्षता विभागात गेल्या पाच दिवसापासून तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सदर महिला आरती बोडखे यांचा पाचव्या दिवशी मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. आईच्या मृत्यूमुळे नवजात बालक मात्र आईच्या मायेला पोरके झाले आहे.