पाचोरा तालुक्यात गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे जुन्या वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार दि. १० मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोपट ओंकार राठोड (२२, सातगाव डोंगरी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो गावात आई, वडील, पत्नी, २ मुले, भाऊ यांच्यासह राहत होता. रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या वादातून संशयित आरोपी राहुल अभिमान आलाट (२५, सातगाव डोंगरी, ता.पाचोरा) याने पोपट राठोड या तरुणाच्या डोक्याला दोन वेळा हातातील कड्याने मारहाण केली तसेच आज तुला जिवंत सोडणार नाही म्हणून जमिनीवर जोरदार आपटले.
डोक्याला जबर मार बसल्याने पोपट राठोड या तरुणाचा मृत्यू ओढवला. तरुणाच्या खून प्रकरणी सुरेश हंसराज तंवर यांच्या फिर्यादीवरुन संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित राहुल आलाट याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक धनंजर येरूळे यांनी भेट दिली. तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश काळे करीत आहेत.