जळगाव शहरातील शिवकॉलनी जवळ हॉटेलमधील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिव कॉलनीतील हॉटेल स्वाद येथे जेवणासाठी गेलेल्या पोलिसाला तीन जणांनी दारूच्या नशेत येवून शिवीगाळ व मारहाण करत जवळील खूर्ची मारून डोळ्याला दुखापत केल्याची घटना मंगळवारी दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितेश जयराम बच्छाव (वय ३३ रा. वाघ नगर, जळगाव) हे रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे हजेरी मास्टर आहेत. ते मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा ११ वाजेच्या सुमारास त्याचे मित्र होमगार्ड शरद साळवे व दिपक असे तिघेजण शिवकॉलनीतील हॉटेल स्वाद येथे जेवणासाठी बसलेले होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला नितीन देशमुख (वय ५०, रा. जिल्हापेठ, लिलाधर तायडे (वय ७१ रा. शिवकॉलनी) आणि विनोद चव्हाण (वय ३५ रा. धरणगाव) हे तिघे दारू पिण्यासाठी बसलेले असतांना मोठमोठ्याने आरडाओरड करत होते.
त्यावेळी नितेश बच्छाव यांनी तिघांना हळू आवाजात बोलण्याचे सांगितले. या रागातून तिघांनी नितेश याला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जवळील खुर्ची मारून डोळ्याला दुखापत केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार बुधवारी ७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता मारहाण करणारे नितीन देशमुख, लिलाधर तायडे आणि विनोद चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.