जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षाचालकांच्या दादागिरीविषयी पोलिसांकडे अनेकदा तक्रारी येतात. आता पुन्हा एक तक्रार शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. भाडेतत्वावर ठरवलेली रिक्षा रद्द केल्याचा राग आल्याने एका रिक्षाचालकाने शिक्षकास मारहाण केली. यामध्ये लाकडी फळी, विट डोक्यात मारल्याने शिक्षकाला दुखापत झाली. ही घटना रेल्वेस्थानकानजीक रिक्षा थांब्यावर रविवार दिनांक ९ जून रोजी रात्री घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय पुनीलाल ठाकूर (४८, रा. मोहननगर, जळगाव) असे जखमी शिक्षकांचे नाव आहे.
संजय ठाकूर यांच्या काकांचे सोमवार दिनांक १० जून रोजी उत्तरकार्य असल्याने रविवारी रात्री ठाकूर यांच्या बहीण व मेहुणे हे रेल्वेने जळगावात आले. त्यांना घेण्यासाठी ठाकूर रेल्वेस्थानकावर गेले होते. तेथे रिक्षा शोधत असताना एक रिक्षा (क्र. एमएच १९, व्ही ९४७३) ठरविली. मात्र बहीण व मेहुणेही रिक्षा पाहत असल्याने रविलेली रिक्षा रद्द केली.
त्यातून सदर रिक्षाचालक राहुल नामक हा वाद घालू लागला व त्याने शिवीगाळ करत ठाकूर यांना मारहाण केली. तसेच लाकडी फळी व विट डोक्यात मारल्याने त्यांना दुखापत झाली. याशिवाय त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व चष्मा तोडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी ठाकूर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रिक्षाचालक राहुल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दिलीप पाटील करीत आहेत.