गिरणा धरणातून ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, ४ दरवाजे उघडले
जळगाव (प्रतिनिधी) :- काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील मन्याड हे धरण १०० टक्के भरल्यानंतर, आता अंजनी धरणातील जलसाठादेखील १०० टक्के झाला आहे. यामुळे अंजनी धरणातून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
दुसरीकडे गिरणा धरणाच्या जलसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु असल्याने, गिरणा धरणातून ४ हजार ९५२ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. गिरणा धरणाचे चार दरवाजे ३० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. गिरणा धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा गिरणा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील वाघूर, गिरणा या मोठ्या धरणांसह मध्यम प्रकल्पांमध्येही चांगला जलसाठा झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगामासाठीच्या पाण्याचा ताण मिटला आहे. हतनूर धरणानेही शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. यासह शेळगाव बॅरेजमध्येही १०० टक्के जलसाठा लवकरच होणार आहे. तसेच सुकी, अग्नावती, तोंडापूर ही धरणे आधीच १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. पुरेसे तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पाऊस झाल्यामुळे तापीलाही पूर आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांची स्थिती पाहता, सर्वच नद्या खळखळून वाहत आहेत.