“रक्तदान हेच श्रेष्ठ दान”चा संदेश; पै.शिवाजी पाटील यांचा ५७ वेळा रक्तदानाचा विक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) –“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या सामाजिक संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ६७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमातून गरजू रुग्णांसाठी अमूल्य रक्तसाठा उपलब्ध झाला असून समाजासमोर मानवतेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात आला.

पैलवान शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी विक्रम
या शिबिराचे विशेष आकर्षण ठरले ते गिरीष महाजन वैद्यकीय पक्षाचे आरोग्यदूत पैलवान शिवाजी रामदास पाटील. त्यांनी तब्बल ५७ वेळा रक्तदान करून समाजसेवेचा प्रेरणादायी विक्रम नोंदविला. “रक्तदानामुळे एखाद्याला नवजीवन मिळत असेल तर त्यापेक्षा मोठे समाधान नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कार्याचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.
रक्तदान शिबिराला आमदार राजू भोळे, महापौर दीपमाला काळे, भाजप महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. मनोज टोके यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
जी.एम. फाउंडेशनचे विशेष योगदान
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जी.एम. फाउंडेशन जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उदय भालेराव, नगरसेवक सुनील खडके, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, सुचिता हाडा, पितांबर भावसार, होनाजी चव्हाण, भैय्या पाटील, कल्पेश बेलदार, संतोष पवार, तुकाराम, क्षितिज भालेराव, कोल्हे, आश्विन सैंदाणे, सचिन धनगर, हेमंत पाटील आदींनी नियोजनात सक्रिय सहभाग घेतला.
वैद्यकीय पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका
रक्त संकलन प्रक्रियेसाठी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. हर्षदा पाडवी, डॉ. श्रद्धा गायकवाड, डॉ. फैज सय्यद तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ दीपक होनमाने, अश्विनी यादव आणि रेहान शेख यांनी जबाबदारी पार पाडली. समाजसेवा अधीक्षक प्रदीप पाडावी, नर्सिंग अधिकारी सतीश गोडीलोहर, कक्षसेवक पवन तायडे आणि वाहनचालक जगन्नाथ जाधव यांनीही मोलाचे सहकार्य केले.
समाजासाठी प्रेरणादायी संदेश
आजच्या धावपळीच्या जीवनात अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच गंभीर आजारांमुळे अनेकांना रक्ताची तातडीची गरज भासते. अशा वेळी रक्तदाते हेच खऱ्या अर्थाने जीवनदाते ठरतात. एका रक्तदात्यामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात, ही भावना मनात ठेवून अनेक युवकांनी या शिबिरात सहभाग घेतला.
“वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जीव वाचविण्याचा संकल्प मोठा” असा सामाजिक संदेश देणारे हे रक्तदान शिबिर समाजासाठी प्रेरणादायी ठरले.









