नाशिक जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई
नाशिक (प्रतिनिधी) : पोलिस आणि तहसील विभागाच्या पथकाने मनमाड तालुक्यात गणेशनगर भागात एका बंगल्यावर छापा मारून शिक्षक मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेली पैशांची ४५ पाकीटे जप्त केली. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. येवला येथेही अशाच कारवाईत पैशाची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पाच जिल्ह्यात उद्या दि. २६ जून रोजी मतदान आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर या पाच जिल्ह्यात मतदान होणार आहे. दरम्यान, आज मतदारांना पैसै वाटप केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनमाड शहरात गणेशनगरला एका बंगल्यात शिक्षक मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
महसूल विभागाचे अधिकारी कैलास गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलिस पथकाने संयुक्तरीत्या या बंगल्यावर छापा मारला. छाप्यावेळी पथकाला दोन व्यक्ती तेथे आढळल्या. बंगल्याच्या तपासणीदरम्यान एका पिशवीत ४५ पाकिटे आणि शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा फोटो असलेले प्रचार साहित्य आढळले. प्रत्येक पाकिटात ५ हजार रुपये होते.
सर्व पाकिटे आणि प्रचार साहित्य जप्त करून दोघा संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी एस. एम. गुळवे यांनी दिली.