औरंगाबाद ( वृत्तसंस्था ) – पैठण येथील डोंगरू नाईक तांड्यावर रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा आणि सुनेने कुऱ्हाडीच्या दांड्याने बापाला मारहाण केली.
उपचार सुरु असताना जखमी बापाचा मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी घडली असून राजू भुरा चव्हाण असे या दुर्दैवी बापाचे नाव आहे.
मालमत्तेच्या वाटणीवरून राजू भुरा यांचा मुलगा मांगीलाल व सून कोमल यांच्यासोबत वाद होता. मंगळवारी याच कारणावरून त्यांच्यामध्ये जोराचे भांडण झाले. हा वाद इतका टोकाला गेला की, मुलगा आणि सुनेनं कुऱ्हाडीच्या दांड्याने राजू चव्हाण यांना जबर मारहाण केली. ते गंभीर जखमी झाले. राजू चव्हाण यांना तत्काळ बिडकीन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा मांगीलाल व त्याची पत्नी कोमल यांना अटक केली.