भोपाळ ( वृत्तसंस्था ) – घटस्फोट न घेताच पत्नीने दुसरं लग्न केलं. विभक्त राहायला लागल्यापासून ती दर महिन्याला खर्च घेत होती, मात्र नंतर दुसऱ्या पुरुषासोबत राहू लागली, अशी फिर्याद घेऊन नवरा पोलीस स्टेशनला पोहोचला आणि पत्नीला परत नांदायला आणण्याची मागणी पोलिसांकडे करु लागला. भिंडमध्ये ही घटना समोर आली आहे. आपल्याला पहिला नवरा आवडत नाही, म्हणून आपण दुसरे लग्न केले, असे विवाहित महिलेचे म्हणणे आहे.
हे प्रकरण मध्य प्रदेशातील भिंडमधील मेहगाव भागातील आहे. मेहगाव येथील रहिवासी धर्मेंद्र जाटव यांचा विवाह चार वर्षांपूर्वी राखी नावाच्या महिलेशी झाला होता. 4 मार्च 2017 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काही महिन्यांनंतर घटस्फोट न घेता राखी आणि धर्मेंद्र जाटव वेगळे झाले.
या काळात धर्मेंद्र आपल्या पत्नीला उदरनिर्वाहासाठी पैसे देत होता, पण अचानक एके दिवशी धर्मेंद्रला समजले की त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले आहे. त्याची पत्नी तिच्या दुसऱ्या पतीपासून गर्भवती झाल्याचंही समजल्याने धर्मेंद्रच्या पायाखालची जमीनच सरकली.
पती धर्मेंद्रने थेट भिंडच्या डीएसपी पूनम थापा यांना गाठले डीएसपी पूनम थापा यांनी धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि त्यांच्या दुसऱ्या पतीला फोन केला. राखीने पहिला पती धर्मेंद्रसोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्या दुसऱ्या पतीने सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीच्या पहिल्या लग्नाची कोणतीही माहिती नाही.
मंदिरा व्यतिरिक्त कोर्टातही राखीने दुसरे लग्न केले. तिचा पहिला पती धर्मेंद्र म्हणतो की, त्याला त्याची पत्नी परत हवी आहे, तो तिला सांभाळत आहे. पण तिने दुसरं लग्न कधी केलं ते कळलंच नाही. घटस्फोटच झाला नाही, तर दुसरे लग्न कसे होईल, असा सवालही धर्मेंद्रने विचारला आहे. डीएसपी पूनम थापा सांगतात की, जी काही कायदेशीर कारवाई करता येईल, ती केली जाईल.