सायबर पोलीस स्टेशनचा तपास, दीड लाख रुपये हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील ढाके कॉलनी येथील रहिवासी महिलेचा विश्वास संपादन करून त्यांची एफडीची रक्कम तोडत ती काही सायबर गुन्हेगारांनी स्वतःच्या खात्यात वळवून पावणे आठ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तपास करीत पश्चिम बंगाल व झारखंड येथील दोघं भामट्याना अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपये हस्तगत करण्यात आली आहे.
लीना राजेंद्र भोळे (वय ४८, रा. ढाके कॉलनी, जळगाव) यांनी २१ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्याद दिली होती. लिना राजेंद्र भोळे यांची बंधन बँकेत फिक्स डिपॉझिट आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांना फोन आला. समोरील व्यक्तीने आपण बंधन बँकेतून बोलत असून त्याने भोळे यांना त्यांच्या फिक्स डिपॉझिटबद्दल माहिती सांगितली. तसेच तुमची एफडी अपडेट करायची असून तुमच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल. तो मॅसेज त्या इसमाने त्याच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यास सांगितला. लिना भोळे यांना त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास झाल्याने त्याने त्यांच्या मोबाईलवर आलेला मॅसेज त्या इसमाला पाठविला. काही वेळातच महिलेच्या खात्यातून पैसे कपात झाल्याचा त्यांना मॅसेज प्राप्त झाला.
बँकेतून पैसे कपात झाल्याचे समजताच लिना भोळे यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. भोळे यांनी लागलीच बँकेत तक्रार करुन खाते ब्लॉक करुन घेतले. त्यानंतर सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी २१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सायबर पोलीस स्टेशन कसून तपास करीत होती. यात पोलिसांनी विशाल सुरेश साव (वय २३, रा. आसनसोल, जि. पश्चिम वर्धमान, प. बंगाल) याला पूर्वी अटक केली होती. त्याचा सध्या जामीन झाला आहे.
या घटनेत आणखी काही संशयित आरोपी यांचा समावेश असल्याचे दिसून येत होते. त्यानुसार माधवकुमार उदयप्रसाद सिंह (वय ३१, बिशनपूर जि. धनबाद, झारखंड) आणि शुभम उत्तम साव (वय २५, रा. नियामतपूर जि. पश्चिम वर्धमान, पश्चिम बंगाल) यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. ते पोलीस कोठडीत होते. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणाचा यशस्वी तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बाळकृष्ण पाटील, कॉन्स्टेबल अरविंद वानखेडे, श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे यांनी केला आहे.