चिंचोली शिवारातील घटना; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा
जळगाव : – तालुकयातील चिंचोली शिवारात महावितरणच्या इलेक्ट्रीक पोलवरील तारांसह त्याठिकाणी लावलेले चॅनल कट पॉईंट, इन्सुलेटर असा एकूण ४ लाख ४४ हजार रुपयांचे साहित्य तीन ते चार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना २८ मे ते दि. ६ जून रोजी दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील अयोध्या नगरातील सिद्धीविनायक शाळेजवळील रहिवासी संजय रामभाऊ वराडे हे शासकीय कंत्राटदार असून ते जिल्हाभरात महावितरणचे तार आणि पोल टाकण्याचे काम करतात. त्यांचे चिंचोली सब स्टेशन येथे इलेक्ट्रीक तार ओढण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. दि. २८ मे रोजी त्यांच्याकडील सुपरवायझर रुपेश वराडे हे चिंचोली शिवारातील साईटवर गेले. याठिकाणी साईटवरील काही एमएसईबीच्या पोलवरील तारा लोंबकळत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना अकार गाल्यामधील तार, चॅनल कट पॉईंट व इन्सुलेटर असे साहित्य दिसून आले नाही. त्यानंतर दि. ६ जून रोजी त्यांच्या साईटजवळील शेतातील सुभाष पावरी यांनी फोन करुन चिंचोली शिवारातील तीन पोलीवरील तार कोणीतरी कट करीत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार संजय वराडे यांनी पुतण्याला लागलीच त्याठिकाणी पाठविले.
रुपेश वराडे यांना पाहून तीन ते चार चोरटयांनी मारण्याची धमकी देत त्याहून पळ काढला. साईटवरील साहित्याची पाहणी केल्यानंतर वराडे यांनी त्याठिकाणी बसवलेली तार, चॅनल कट पॉईट व इन्सुलेटर हे चोरट्यांनी वेळोवेळी ३ लाख ६९ हजारांची २४०० मिटर तार, ४० हजारांचे इलेक्ट्रीक चॅनल कट पॉईंट, ३५ हजारांचे इलेक्ट्रीक पोलचे इन्सुलेटर असा एकूण ४ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची त्यांना खात्री झाली. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.