धामणगाव येथील घटना ; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
जळगाव : – घरातून गहू हरभरा असे धान्य शेतकरी झोपेत असताना चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार तालुक्यातील धामणगाव येथे उघडकीस आला होता. मात्र शेतकर्याने चोरून नेलेल्या धान्याचे सांडलेले कण पाहून चोरट्याच्या घरापर्यंत माग काढून चोरट्याला रंगेहाथ पकडले.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी सुरेश रामदास भालेराव (वय ३०) यांच्या घराचे वरील बांधकाम सुरू आहे. दि. २० जून रोजी रात्री भालेराव कुटुंबीय खालच्या मजल्यावर झोपले होते. वर बांधकाम सुरू असल्याने तेथे दरवाजा लावलेला नव्हता. रात्रीच्या वेळी वरील मजल्यावर ठेवलेले सुरेश भालेराव व त्यांचे चुलत भाऊ प्रकाश भालेराव यांचे ७० किलो हरभरा व ५० किलो गहू असे एकूण सात हजार ४०० रुपये किमतीचे धान्य चोरट्याने चोरून नेले. सकाळच्या सुमारास शेतकरी जागे झाल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
चोरी करताना गोणीमधून धान्य पडत गेल्याने थेट चोरट्याच्या घरापर्यंत सांडलेले होते. त्यानुसार शेतकऱ्याने माग काढला. त्या वेळी दीपक न्हायदे याच्या घरात ते धान्य सापडले. पोलिसांनी त्याला तालुका पोलिस ठाण्यात आणले. त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांना संशयित चोरट्याला अटक करून शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.