जळगाव;- गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवांसारखे उत्सव तोंडावर आहेत. अशा काळात अखंडित आणि अधिक सुरळीत वीजपुरवठ्यांची नागरिकांची अपेक्षा असते. मात्र अनाधीकृत वीज वापरांमुळे वीज वाहिन्या अतिभारीत होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची भिती असते. अखंडित पुरवठा देण्याचा भाग म्हणून जळगाव परिमंडलात मुख्य अभियंताइब्राहिम मुलाणी यांच्या निर्देशानुसार अनाधिकृत वीज वापरणाऱ्यांविरुध्द महावितरणतर्फ़े मोहीम हाती घेण्यात आली. त्यातर्गंत धुळे जिल्ह्यातील (ता. दोंडाईचा) मालपूर – हट्टी गावठाण वाहिनीवर वीजचोरी प्रकरणी चार जणांविरुध्द भारतीय विद्युत कायद्यार्तंगत कलम 135 नुसार मोठी कारवाई करण्यात आली.
गुरुवार दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी मालपूर शाखा 1 मधील हट्टी गावठाण वाहिनीवर लोटन खांडेकर, योगेश मासुळे, धर्मा पदमोर आणि समाधान खांडेकर हे वीज वाहिनीवर आकडे टाकून चोरुन वीज वापर करीत असताना महावितरणच्या पथकाला आढळून आले. त्यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता मिलींद इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ पंकज सोनवणे, विजय सैंदाणे, अमन पिंजारी यांनी वीज चोरीतील वायरसह इतर साहित्य जप्त करुन वीज चोरांविरुध्द भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार कारवाई केल्याची माहिती दोंडईचा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.