मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे निर्देश
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या जळगाव जिल्ह्यातील एकूण १८०० शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर आणि नियमिततेवर थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल लक्ष ठेवणार आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळांमध्ये मध्यान्ह भोजन ठरवून दिलेल्या प्रती प्रमाणे व मेनू अनुसारच दिले जाणे आवश्यक आहे. याच्या अंमलबजावणीसाठी एक अभिनव पाऊल उचलत, जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून दररोज मध्यान्ह भोजनाचे जिओ-टॅगिंगसह फोटो पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जे मुख्याध्यापक दररोजचे फोटो अपलोड करणार नाहीत, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन वितरणात पारदर्शकता, शिस्त आणि गुणवत्तेची खातरजमा होणार आहे.दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालूका पोषण आहार अधीक्षक यांनी ग्रुप वर आलेल्या मध्यान्न भोजनाच्या छायाचित्रांचे मोजणी करून रेकॉर्ड ठेवायचे आहे. त्या सोबतच मध्यान्न भोजनासाठी दिले जाणारे पदार्थ दिसतील अशा पद्धतीनेच छायाचित्र काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम शालेय शिक्षणात पोषण सुरक्षा सुनिश्चित करणारा ठरेल, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.