भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील कवाडेनगरातील रहिवाशी सुचिता शुभम बारसे (25) या विवाहितेचा चाकूचे वार करून निर्घृण करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. पोलिसांनी अवघ्या चार तासात या खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. आरोपी महिलेचा पती शुभम चंदन बारसे (26, कवाडे नगर, भुसावळ) यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले .
सुचिता बारसे (25) व पती शुभम बारसे यांच्यात खटके उडत असल्याने आरोपीने पत्नीला आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागील जंगलात रात्री आणले. घरातील चाकूने पत्नीवर आधी सपासप वार केले व नंतर तिचा गळा आवळून खून केला. नंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस यंत्रणेने धाव घेतली. काही वेळेतच उपस्थित नागरीकांच्या माध्यमातून मृत महिलेची ओळख पटवण्यात यश आले.
महिलेचा खून झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले.