भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथे एका इसमाचा क्षुल्लक कारणावरून खून झाल्याची घटना रविवार दि. १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते तर संशयित आरोपी हा फरार झालेला आहे.
प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (वय ४८, रा. शिवाजीनगर, वरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो वरणगाव फॅक्टरी येथे एका चहाच्या दुकानाजवळ वडापाव खाण्यासाठी सकाळी ९.३० वाजता गेला होता. वडापाव खात असताना तेथे उभा असलेला संशयित आरोपी दीपक सिंग याच्याशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात दीपक सिंग याला राग अनावर झाल्याने त्याने घरी जाऊन लाकडी दांडा घेऊन आला.
त्यावेळी खुर्चीवर बसलेल्या प्रमोद महाजन यांच्या डोक्यात मागील बाजूने तीन वार केल्याने प्रमोद महाजन यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दीपक सिंह ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथेच कामाला आहे. तर मयत प्रमोद महाजन हे हरताळा येथे पाणीपुरवठा विभागात कामाला होते. दरम्यान घटना घडताच आजूबाजूला पळापळ सुरू झाली. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मयत प्रमोद महाजन यांचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ आणि त्यांचे सहकारी हे घटनेचा तपास करीत असून संशयित आरोपी दीपक सिंग हा फरार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. दरम्यान वरणगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.