पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोहारा येथील पाणीपुरवठा कर्मचारी सुभाष रामराव बाविस्कर यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळ्यात सपत्नीक ग्रामस्थांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव अमृत महाजन यांची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत कर्मचारी हा गावासाठी उन्ह-वारा-पाऊस याची तमा न बाळगता काम करीत असतो. सेवानिवृत्त झाल्यावर त्याच्या पाठीवर किमान कौतुकाची थाप देणे ही सुजान ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि गाव यांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अमृत महाजन यांनी केले. सुभाष बाविस्कर हे फेब्रुवारीमध्ये सेवानिवृत्त झाले असून ग्रामपंचायतीने त्यांना रोजंदारी कर्मचारी म्हणून परत सेवा विस्तार दिला आहे. त्यांच्या सेवेच्या गौरव करीत म्हणून तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने बाविस्कर दाम्पत्याचा सत्कार ठेवला होता.
सभेचे आयोजक पाचोरा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यावेळी या सभेत सुभाष बाविस्कर व त्यांच्या पत्नी सरलाताई बाविस्कर यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला. त्यात उत्तर महाराष्ट्र परीट महासंघाचे उपाध्यक्ष रमेश लिंगायत, माध्यमिक शिक्षक पवार, वाचनालय ग्रंथपाल कलाल, चंदू खरे तसेच लोहारा परिसरातील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सन्मान केला. सभेला ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य समिती सदस्य निलेश पाटील, निलेश गोपाळ, चेतन राजपूत, मंगेश खैरनार, राजू कोळी, रमेश सोनवणे, मीना लोहारे, चंद्रकांत शेळके, प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.